तंत्रनिकेतन प्रवेश प्रवेश प्रक्रिया 18 जुलैपर्यंत

| अलिबाग | वार्ताहर |

तंत्रनिकेतन पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया दि. 29 मेपासून सुरू झालेली असून, त्याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्‍चिती व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया आता 18 जुलैपर्यंत करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्‍चिती www.dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर करावयाची आहे.

तंत्रशिक्षण हा एक अल्पावधीत रोजगार मिळवून देणारा उत्तम पर्याय आहे. तंत्रशिक्षण पदविका शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असून, अभ्यासक्रमामध्ये 12 आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अंतर्भूत आहे.

या अभ्यासक्रमाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्काची प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. याअंतर्गत सर्व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्‍या इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती मिळणार आहे. तरी अधिकाधिक मुलींनी या संधीचा फायदा घ्यावा. याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्याकडून दिल्या जाणार्‍या विविध शुल्क सवलती/ शिष्यवृत्ती योजना देखील मुलामुलींकरिता उपलब्ध आहेत. तंत्रनिकेतन प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतन पेण येथील सुविधा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन पेणचे प्र. प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी केले आहे.

Exit mobile version