थकबाकीदारांची यादी प्रसिध्द कराच : नागरिकांची मागणी
| नागोठणे | वार्ताहर |
मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम थकविली आहे. गावातील अनेक सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीचा हा कर इमाने-इतबारे भरीत असतांनाच हा कर थकविणा-यांमध्ये अनेक बड्या धेंड्याचा व श्रीमंत वर्गाचा समावेश आहे. या सर्व थकबाकीदारांना कर भरण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात येऊनही घरपट्टी व पाणीपट्टी कराची थकीत रक्कम न भरणा-या खातेधरकांची नळ जोडणी तोडून पाणीपुरवठा बंद करण्याची मोहीम ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. त्यानुसारच गुरूवारी (दि. 22) नागोठण्यातील अनेक भागांतील 12 नळ जोडणी तोडण्यात आली. तसेच, आगामी काळात ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी थकविणा-यांची यादी प्रसिध्द करण्यात येईल असेही ग्रमपंचायत कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
तोडण्यात आलेल्यांमध्ये मोहल्ला भागातील 4, शांतीगर भागातील 3, गांधीचौक 1 सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटी, आयटीआय समोरील वसाहत 2 व खडकआळी मधील 2 अशा 12 खातेदारांचा समावेश आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे व ग्रामसेवक राकेश टेमघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेतील पथकात कार्यालयीन प्रमुख प्रमोद चोगले, वसुली क्लार्क किसन शिर्के, अधिक गोरे, भास्कर घाग, हेमंत जाधव, राजू नागोठणेकर, विनोद घासे, संतोष पाटील, प्लंबर हरेष शिर्के, शुभम राऊत, शाहिद सय्यद यांचा समावेश आहे. ही मोहिम सुरूच राहणार असल्याचे ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी सांगितले.
दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयातून केवळ गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनाच वसुलीसाठी त्रास देण्यात येत असून ग्रामपंचायतीने केवळ इशारा न देता खरोखरच थकबकिदारांची यादी जाहीरपणे ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर, चौकाचौकात व वर्तमान पत्रात प्रसिध्द करावीच. मग ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन श्रीमंत थकबाकीदारही समोर येतील अशी मागणी इमाने-इतबारे घरपट्टी भरणा-या नागरिकांतून होत आहे.
नागोठणे ग्रामपंचायत हद्दितील सर्व घरपट्टी व पाणीपट्टी खाते धारकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे सर्व घरपट्टी व पाणीपट्टी खाते धारकांनी येत्या 10 फेब्रूवारी 2024 पर्यंत आपली घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरणा करून होणार्य़ा कार्यवाही पासून आपला बचाव करावा असेही ग्रामसेवक टेमघरे यांनी स्पष्ट केले होते. थकबाकीदारांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी 10 फेब्रूवारी 2024 पर्यंत भरणा न केल्यास आपले नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 129 अन्वये आपल्याविरुध्द जप्तीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेऊन सर्व थकबाकी धारकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे दिलेल्या वेळेत भरणा करून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहनही ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते. मात्र मुदती नंतरही रक्कम न भरणा-यांविरोधात ही नळ जोडणी तोडण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.