पावसाची चाहूल लागताच कर्मचार्यांची लगबग
। उरण । वार्ताहर ।
पावसाची चाहूल लागताच उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयातील इमारतींच्या छतावर ताडपत्रर पांघरुण ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केला आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या फायली, तसेच दस्तावेज असलेल्या कार्यालयांची दुरवस्था दरवर्षी ताडपत्री लावूनच झाकणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.|
उरण तालुक्यातील सर्रास शासकीय कार्यालयातील इमारतींची दुरवस्था झाली आहे.त्यात छतावरील पत्र्यांची, कौलांची दुरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपून कार्यालयातील संगणक, महत्त्वाची कागदपत्रे भिजत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय अधिकारी वर्गाने यावर्षी लवकर आपापल्या इमारतीच्या छतावर ताडपत्री पांघरुण ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सामान्य नागरिकांची घरेसुद्धा सुस्थितीत असतात, मग असल्या गळक्या सरकारी कार्यालयांची डागडुजी होणार की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. शासन याकडे लक्ष देणार की नाही, की बघूनही न बघितल्याचा आव आणत आहे, हेच कळत नाही.






