तासगावकर फार्मसी महाविद्यालयाला नॅक अ मानांकन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या यादवराव तासगावकर फार्मसी महाविद्यालयाला राष्ट्रीय विद्यापीठ म्हणून नॅक मानांकन मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी तीन आणि चार नोव्हेंबर रोजी या महाविद्यालयाचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन केले होते.

तालुक्यात चांधई येथे यादवराव तासगावकर शैक्षणिक संकुल सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट कडून उभारण्यात आले आहे. 25 वर्षात या संस्थेने अभियांत्रिकी, मेडिकल, औषधी, नर्सिंग, प्रायमरी या क्षेत्रात तब्बल 50 हून अधिक महाविद्यालये यांची साखळी निर्माण केली आहे. या संस्थेच्या यादवराव तासगावकर फार्मसी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील नॅक अ मानांकन मिळाले आहे. अशी माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी आपल्या वेब साईटवर जाहीर केली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात शैक्षणिक संकुल विकसित करणाऱ्या तासगावकर समूहाच्या महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या मार्गदशनाखाली प्राचार्य म्हणून डॉ. रुपाली राजेश तासगावकर यांच्याकडे कार्यभार आहे. प्राचार्य आणि त्यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवसरात्र घेतलेल्या परिश्रमाला योग्य न्याय मिळाला असून सदर महाविद्यालयाला दिवाळीची गोड भेट मिळाली आहे.

आमच्या संस्थेसाठी हा मोठा बहुमान असून आमच्या महाविद्यालयाला नॅक अ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे आता येथील शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आली असून आणखीन आधुनिक करण्यासाठी प्रयत्न आणि योगदान देण्याची महत्वाची जबाबदारी आमच्यावर आहे.

डॉ. रुपाली तासगावकर, प्राचार्य
Exit mobile version