चवदार तळ्याचे पाणी होणार शुद्ध

माज कल्याण विभागाची शुद्धीकरण प्रक्रियेस मंजुरी
। महाड । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मंजूर केलेल्या चवदार तळे शुद्धीकरण प्रक्रिया महाड नगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सिक्यूलेशन सोलर सिस्टमद्वारे पुढील पाच वर्षांकरिता राबविली जाणार आहे. 22 व 23 जुलै 2021 रोजी महाडमध्ये आलेल्या जलप्रलयांत शहराच होत्याचं नव्हतं झालं असतानाच चवदार तळ्याचे पाणी प्रदूषित झाले होते. यानंतर तात्काळ राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः महाड येथे भेट देऊन सर्वप्रथम लवकरात लवकर शहर स्वच्छ करत चवदार तळ्याच्या संपूर्ण पाण्याचा उपसा करत चवदार तळे स्वच्छ करण्यात यश मिळविले होते.
चवदार तळ्याच्या दूषित पाण्यामुळे येथे रोज भेट देणार्‍या आंबेडकरी अनुयायींची गैरसोय पाहता राज्याच्या समाज कल्याण विभागाने चवदार तळे शुद्धीकरणाच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधत समाज कल्याण विभागाने या शुद्धीकरणाचे काम 1 कोटी 37 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकान्वये पाच वर्षांकरिता नगरपालिकेमार्फत ऑरगेनिक बायोटेक (मुंबई) या कंपनीला ठेका दिला आहे. गेली अनेक वर्षे चवदार तळ्याच्या पाण्याची शुद्धीकरणाची मागणी होत होती. ती आता पूर्ण होत आहे. यामुळे आता तळ्याच्या पाण्यातील शेवाळाचे प्रमाण कमी होणे, त्याचबरोबर पाण्यातील जैवविविधेतेचे संरक्षण स्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version