टाटा धरणाचे दगड ग्रामस्थांच्या घरांवर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा पॉवर कंपनीसाठी धरण बांधण्याचे काम सुरु आहे. तेथे धरण बांधण्यासाठी खोदकाम केले जात असून, मोठ्या प्रमाणात दगड फोडले जात आहेत. हे दगड टाटा कंपनीच्या कुंपणालगत असलेल्या आदिवासी लोकांच्या घरावर येत आहेत. त्याबाबाबत स्थानिक आदिवासी लोकांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडी आणि तापकीरवाडी परिसरात टाटा पॉवर कंपनीच्या धरण प्रकल्पासाठी गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसत असून, जीवितास धोका निर्माण झाला आहे. रविवारी दुपारी करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटामुळे प्रचंड आवाज झाला, त्यावेळी झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की परिसरातील अनेक घरांना जोरदार हादरे बसले.ब्लास्टिंगवेळी सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या रबर मॅटचा मोठा तुकडा उडून दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत तापकीरवाडी आदिवासी वाडीमधील रहिवाशी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. प्रकल्प परिसरात रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी ब्लास्टिंग केले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः झोपेत असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुले स्फोटांच्या आवाजाने दचकून जागी होतात. महिलांमध्येही सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. रात्री-अपरात्रीच्या स्फोटांमुळे ज्येष्ठ, गरोदर महिला, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लास्टिंग तातडीने थांबवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, आणि प्रकल्पस्थळी सुरक्षेचे कठोर नियम लागू करावेत अशी मागणी केली आहे.

Exit mobile version