टाटा पॉवर कंपनीचे पथक पोफळीत

कोयना प्रकल्पाच्या खाजगीकरणाचे संकेत
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोयना प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी टाटा पॉवर कंपनीचे पथक पोफळीत दाखल झाले असून, यामुळे या प्रकल्पाचे खासगीकरण होणार याचे खात्रीशीर संकेत मिळू लागले आहेत. कोयना प्रकल्पाचे खासगीकरण होणार नाही, अशी सारवासारव महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री करत असले तरी टाटा पॉवर कंपनीने कोयनेच्या या दोन प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रातील 27 पैकी 6 विद्युत प्रकल्पांचे खासगीकरण होणार असून, यामध्ये कोयना धरण, पायथा विद्युत ग्रह आणि कोयनेचा तिसरा टप्पा खाजगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास कामगार संघटना आणि सामान्यांकडून उद्रेक होईल या भीतीने जलसंपदा विभागाकडून सावधगिरी बाळगली जात आहे.
टाटा कंपनीतील कार्यकारी अभियंता या उच्च पदावरील तीन वरिष्ठ अधिकारी पोफळीतील महाजनकोचे कार्यालय, तिसरा टप्पा आणि कोयना धरण पायथा विद्युत गृहाला भेट देऊन तांत्रिक माहिती तपासत आहेत. या दोन प्रकल्पाचे नूतनीकरण व अधुनिकीकरण करून परीचालन करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जलसंपदा विभागाने कोयना प्रकल्पाची उभारणी केल्यानंतर पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाकडे हा प्रकल्प चालविण्यासाठी भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्यात आला होता. 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे त्रीभाजन होऊन महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या यातील महानिर्मिती कंपनीच्या अधिपत्याखाली कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू आहे.
केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार सरकारी प्रकल्पांचेही खाजगीकरण केले जात आहे. देशातील वीज प्रकल्पांच्या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सरकार त्या प्रकल्पांचा प्रकल्प अहवाल तयार करते. देशातील अनेक वीज प्रकल्पांचा प्रकल्प अहवाल टाटा पॉवर कंपनीने तयार करून तो सरकारला दिला आहे.कोयनेच्या परिसरात वीज प्रकल्पाची उभारणी करणे शक्य आहे की नाही याचा प्रकल्प अहवाल 1952 मध्ये टाटा कंपनीने तयार करून तो केंद्र सरकारला दिला होता. कोयनेचे दोन टप्पे टाटा चालवण्यासाठी घेणार की त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनाला देणार हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

Exit mobile version