विकासावर लक्ष केंद्रित करा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

शिंदे गटातील नेत्यांना तटकरेंचा नाव न घेता टोला

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्या; आता राजकीय कुरघोड्यांना लगाम घालून विकासकामांवर लक्ष द्या, असा थेट टोला खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांना लगावला. निवडणुका संपल्याने आता राजकीय तट उरलेले नाहीत, विकासकामांसाठी तब्बल तीन वर्षांचा अवधी आहे, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत तटकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लक्ष्य केले. राष्ट्रवादी विरुध्द शिंदे गटातील अंतर्गत कलहाबाबत विचारणा केली असता तटकरेंनी जोरदार टोलबाजी केली.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता विकासाची तीन वर्षे आहेत. विकासकामांना पुरेसा अवधी आहे. निवडणुका होऊन गेल्या आहेत. राजकीय तट राहिलेले नाहीत; त्यामुळे आता विकासावर लक्ष केंद्रित करावे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार दळवी आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यात जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर एकमेकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील या संघर्षाबाबत खासदार सुनील तटकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी राजकीय वादापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.

राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना तटकरे यांनी रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पुलांच्या कामाचीही माहिती दिली. पेण येथे नवीन रेल्वे स्थानक उभारणे, बागमांडला-बाणकोट पुलासाठी जमीन हस्तांतरण, रेवस-करंजा तसेच साळाव-रेवदंडा पुलाच्या कामाबाबत त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पांना येणाऱ्या अडचणी, भूसंपादन आणि भूसंपादनाच्या रकमेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Exit mobile version