तटकरे पराभवाच्या खाईत? मुस्लिम नेत्यांना उतरवले मैदानात

विसर पडलेल्या बॅ.ए.आर.अंतुलेंचा फोटो बॅनरवर झळकला

| रायगड | आविष्कार देसाई |

महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पराभव दिसू लागला आहे. गुरुवारच्या प्रचार सभेतील बॅनरवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुलेंसह यशवंतराव चव्हाण यांचा फोटो छापल्याचे दिसून आले. तसेच, अल्पसंख्याक समाजाची नाराजी दुर करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुर्शीफ यांना पाचारण केल्याचेही बोलले जाते.

जिल्ह्यात युनानी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येत असून जून महिन्यापासून प्रवेश सुरु होत असल्याचे मुर्शीफांनी सांगितले. मुस्लिम मतदारांना चुचकारण्यासाठी व्यासपिठावरुन अशा विविध घोषणांचा पाऊस महायुतीच्या नेत्यांनी पाडला. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये प्रामुख्याने इंडिया आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट) अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) सुनील तटकरे यांच्याच सरळ लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये तिसर्‍यांदा टक्कर होणार आहे. 2014 गीते, तर 2019 साली तटकरे विजयी झाले होते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट सामिल झाला होता. त्यामुळे राज्यातील सत्तेची समिकरण बदलली. तटकरेंच्या हातून रायगड लोकसभा मतदार संघ खेचण्याचा भाजपाचा यशस्वी प्रयत्न झाला.

तटकरे हे भाजपाच्या तंबूत गेल्याने मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरल्याची उघड चर्चा ऐकायला मिळत आहे. भाजपाची धोरणे ही अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात आहेत, अशी मुस्लिम समाजाची पक्की धारणा आहे. सीएए, एनआरसी अशा कायद्यांमुळे भितीचे रंग अधिक गहीरे झाले आहेत. त्यामुळे तटकरेंना मतदान न करण्याचा ट्रेंड केल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर सुरु आहे. श्रीवर्धन, तळा, म्हसळा, अलिबाग, पेण, रोहा तसेच गुहागर, दापोली अशा तालुक्यातील मुस्लिम समाज तटकरेंच्या विरोधात एकवटला आहे. त्यातील काहींनी उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे तटकरे यांच्या पुढे मोठे आव्हान आहे. यासाठीच त्यांनी अल्पसंख्याक समाजाचे हसन मुर्शीफ यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले असल्याची जोरदार चर्चा आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर अंतुले यांचे बोट धरुन राजकारणात आल्याची जाहिर वाच्यता तटकरेंनी वेळोवेळी केली आहे. त्याच अंतुले यांच्या पाठीत राजकीय खंजीर तटकरेंनी खुपसला हे देखील जगजाहिर आहे. याचा विसर रायगडच्या जनतेला विशेष करुन निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कदापी पडणार नाही. अंतुलेंचा फोटो बॅनवर आणि डोळा मात्र, मतांवर अशी तटकरेंची केवीलवाणी खेळी आहे. जिवंतपणी अंतुलेंची कदर केली नाही, आता त्यांच्या माघारी त्यांचा फोटो वापरु काही साध्य होणार नाही, असे जिल्ह्यातील काही निष्ठावंत काँग्रेस पदाधिकार्‍यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. अंतुले हे देखिल मुस्लिम समाजाचे होते. मात्र त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. तटकरेंना कदाचित पराभव दिसत आहे. यासाठी ते सेफ गेम खेळत असावेत. हे जरी खरे असले, तरी रायगड लोकसभा मतदार संघातील जनता तटकरेंना पराभूत केल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास इंडिया आघाडीतील नेत्यांना वाटत आहे.

Exit mobile version