घटक पक्षांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
| रायगड | आविष्कार देसाई |
भाजपाच्या नाकावर टिच्चून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात माजी खासदार सुनील तटकरे यांना यश आले आहे. त्यामुळे रायगडावर हक्क सांगणाऱ्यांच्या तोंडात मारल्यासारखे झाले आहे. ज्यांनी-ज्यांनी तटकरेंच्या उमेदवारीला विरोध केला, त्यांनाच आता तटकरेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटपर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजपासह तटकरेंवर नाराज असलेले घटक प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळणार की तटकरेंच्या विरोधात काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेकाप हा इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते यांची उमेदवारी सुरुवातीलाच जाहीर केली होती. त्यानुसार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा शेकापने आपल्या खांद्यावर घेतली आहे. देशाचे सर्वोच्च संविधान वाचवण्यासाठी गीते यांना निवडून आणण्याचा चंग आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शेकापने बांधला आहे.
दुसरीकडे महायुतीतील उमेदवार ठरता ठरत नव्हता. अजित पवार गटाकडे असणारा हा मतदारसंघ धैर्यशील पाटील यांच्यासाठी भाजपाला पाहिजे आहे. यासाठी भाजपाने जंग जंग पछाडले. यासाठी त्यांनी दबावतंत्राचादेखील वापर केला. मात्र, ज्या राजकीय पक्षाचा विद्यमान खासदार आहे ती जागा त्यांनाच देण्यात येणार, असा महायुतीचा नियम असल्याने तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याप्रसंगी त्यांनी तटकरे सोडून अन्य कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नव्हती. कितीही विरोध केलात, तरी रायगडची जागा तटकरेच लढवणार, असा संदेश अजित पवारांनी दिल्याचे बोलले जाते. अजित पवारांच्या या कृतीमुळे भाजपासह अन्य घटक पक्षाच्या तोंडात मारल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपाला चोळत बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धैर्यशील पाटील मुनगंटीवारांच्या भेटीला?
भाजपाचे धैर्यशील पाटील हे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीसाठी गेले असल्याची पेणमध्ये जोरदार चर्चा आहे. उरण पॅटर्न राबवण्याबाबत भाजपाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्सुक असल्याचे बोलले जाते. मात्र, सध्याच्या राजकीय चित्रावरुन तटकरेंना मदत करावी लागणार असल्याचे दिसते.
गोगावले काम करणार का?
महाडचे आमदार भरत गोगावले यांनीदेखील तटकरेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. गोगावले यांचे पुत्र विकास यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे गोगावले प्रामाणिकपणे तटकरेंना मदत करणार का, हादेखील प्रश्न आहे.