| म्हसळा | वार्ताहर |
गेली कित्येक वर्षे सुनील तटकरे यांनी सत्ता भोगली; परंतु एवढ्या वर्षात त्यांनी किती लोकांना रोजगार दिले याचे उत्तर द्यावे, मग तुम्हाला अनंत गीते यांना बोलण्याचा काय अधिकार? ही लढाई धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती अशी आहे, असा घणाघात शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांनी करीत विरोधकांचा समाचार घेतला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. आजची सभा होऊ नये म्हणून बरेच जणांनी प्रयत्न केले. परंतु, ही इंडिया आघाडी आहे या आघाडीच्या नादाला तुम्ही न लागणेच तुमच्यासाठी भल्याचे आहे असे सांगताना बॅ. अंतुले साहेबांनी लोकशाहीचा बहुमान केला, सर्वांना समान न्याय दिला. परंतु, आत्ताचे सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम करीत असून, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे पंडित पाटील म्हणाले. शनिवारी म्हसळा येथे इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ म्हसळा येथे इंडिया आघाडीची प्रचंड रॅली म्हसळा येथे काढण्यात आली. या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी माजी मंत्री हुसेन दलवाई, शेकापचे माजी आमदार पंडीत पाटिल, संजय कदम, काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मुईज शेख, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, मुस्लिम समाजाचे माजी सादर अहंमद पेनकर, शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, शेकाप श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अझर धनशे, इम्तियाज पारकर, जोत्स्ना दिघे, अनंत कांबळे, शहर प्रमुख विशाल सायकर, अभय कलमकर, युवासेना अध्यक्ष कौस्तुभ करडे, नगरसेविका राखी करंबे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सुभान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनिल तटकरे यांचा खरपूस समाचार घेऊन शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी करणार्याना कायमचे गाडून टाकण्याचे आवाहन केले. माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी सांगितले आमचे सरकार आले तर ज्या ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय त्या सर्व नेत्यांना प्रथम आत टाकले जाईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि अमित शहा कुठे पळून जाणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ. पीएम फंडातील पैसा मोदींनी कुठे गायब केला याची चौकशी निश्चित केली जाईल असे हुसेन दलवाई यांनी सांगितले. आमचे सरकार आल्यास या देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला सबळ बनविण्यासाठी वर्षाला एक लाख रुपये देण्याची हमी हुसेन दलवाई यांनी दिली.