तौफिकच्या ध्येयाला ‘स्वदेस’चे बळ

आर्थिक मदतीमुळे उच्च शिक्षण घेणे शक्य

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तौफिक मोहम्मद सईद राहटविलकर याला स्वदेसच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. तौफिकने 2018 या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणेरे येथे डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी स्वदेस फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठी पात्र होऊन मुलाखतीद्वारे त्याची निवड झाली, तेव्हापासून तौफिकचा स्वदेससोबत प्रवास सुरू झाला आणि स्वदेस फाऊंडेशनने शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदतीला सुरुवात केली.

तौफिकने मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे शिक्षणाला लागणार अवाजवी खर्च करणे हा खूप मोठा अडथळा होता. अशा वेळी स्वदेस फाऊंडेशनने दिलेले आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तौफिकने त्याच्या ध्येयाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणेरेमध्ये इंस्ट्र्यूमेंटेशन डिप्लोमामध्ये 97.7 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आणि तौफिकने महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.

त्यानंतर त्याने इन्स्ट्र्यूमेंटेशन आणि कंट्रोलमधील बॅचलर पदवी बीटेक पूर्ण केले. गुणवत्ता आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर कॉलेज कॅम्पस फेरीत हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड नावाच्या यूएसए स्थित मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अ‍ॅप्लिकेशन इंजिनिअरच्या भूमिकेसाठी तौफिकची निवड झाली. सध्या तौफिक हनीवेल मल्टिनॅशनल या कंपनीत पुणे येथे चांगल्या पगाराच्या नोकरीला आहे. स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अनेक विकासाची वेगवेगळी कामे होत आहेत. याचबरोबर सन 2014-15 पासून आजपर्यंत रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील इयत्ता 12वीनंतर उच्च शिक्षण घेणार्‍या 598 विद्यार्थ्यांना स्वदेसमार्फत आर्थिक मदत करण्यात आली आहे.

Exit mobile version