सहारा पोलिसांकडून कठोर कारवाई
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर प्रवाशांना धमकावत मनमानी पद्धतीने जादा भाडे उकळणाऱ्या टॅक्सीचालकावर सहार पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याला अटक केली आहे. विमानतळ परिसरात प्रवाशांची फसवणूक आणि दादागिरी करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे विमानतळाबाहेरील काही बेशिस्त टॅक्सीचालकांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.25 जून रोजी वारीस अली सयुद्दीन शेख (49) हा टॅक्सीचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर प्रवाशांच्या शोधात उभा होता. त्यावेळी साध्या वेशातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांच्या भूमिकेत त्याच्याकडे गेले. बोरीवलीपर्यंत जाण्यासाठी चालकाने सुरुवातीला 550 रुपये भाडे निश्चित केले. त्यानंतर प्रवाशांना टॅक्सीत बसवून प्रवास सुरू झाला. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर चालकाचा सूर अचानक बदलला. ठरलेल्या भाड्याऐवजी त्याने थेट 800 रुपयांची मागणी केली. प्रवाशांनी वाढीव भाड्याबाबत विचारणा करत विरोध दर्शविल्यावर चालकाने आक्रमक भूमिका घेत त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. “जेवढे सांगतो, तेवढे पैसे द्यावे लागतील,” अशा स्वरूपाची दादागिरी करत त्याने प्रवाशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चालकाची दादागिरी सुरू असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी आपली ओळख उघड केली आणि त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली आहे. त्याच्याविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याची टॅक्सी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित चालकाचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रियादेखील राबविण्यात आली आहे.
