| धाटाव | वार्ताहर |
विद्यार्थ्यांना घडविणार्या शिक्षकानेच सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोहा तालुक्यातील चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ही घटना आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणार्या या प्रकाराबद्दल स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुंभार असे या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक चणेरा येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो. 24 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना आरोपी शिक्षक अनिल कुंभार याने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अयोग्यरित्या स्पर्श करुन सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या प्रकाराची माहिती पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना दिली. याबाबत पालकांनी संताप व्यक्त करीत रोहा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षक अनिल कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खतीब यांच्यासह अन्य सहकारी तपास करीत आहेत.
या प्रकाराबाबत सध्या काहीही बोलू शकत नाही. परंतु, या घटनेनंतर संबंधित शिक्षकाला समज दिली आहे.
पाटील, मुख्याध्यापक,
न्यू इंग्लीश स्कूल, चणेरा