। वाकण । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त विशेष आभासी कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.संदेश गुरव यांनी पुढील वर्षापासून लागू होणार्या नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन शैक्षणिक धोरण कसे उपयुक्त ठरणार आहे हे उपस्थितांना सांगितले. उच्च शिक्षणाच्या प्रत्येक वर्षात विद्यार्थी पदविका, पदवी व पदव्युत्तर हे महत्वाचे टप्पे पार करणार आहे. शिवाय मध्येच त्याला इतर पदविका किंवा पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. या शैक्षणिक धोरणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना अर्थिक व अन्य कारणाने मध्येच शिक्षण अर्धवट सोडता येणार नाही असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी अनुजा वाटवे, आदित्य वाटवे, निवेदिता म्हात्रे यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांमध्ये डॉ पी. निर्मला ज्योती, डॉ. विलास जाधवर, स्मिता चौधरी, डॉ. मनोहर सिरसाठ, जयेश पाटील, चैत्राली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.श्रीकृष्ण तुपारे यांनी केले तर अभार प्रदर्शन डॉ. विकास शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व 76 विद्यार्थी सहभागी झाले होते.