शिक्षकांच्या पगाराची रखडपट्टी

शासनाकडून अनुदान येत नसल्याने होतोय विलंब
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पगाराला होणार्‍या विलंबामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो आहे. दिवाळीपासून शिक्षकांच्या पगाराची सुरू झालेली रखडपट्टी अजूनही सुरूच आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षकांचे पगार साधारण 1 तारखेच्या आसपास होतात. परंतु राज्याच्या बहुतांश भागात मागील 3 ते 4 महिन्यांपासून शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही. रायगड जिल्हा परिषदेने शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली. त्यातून पहिले दोन महिने वेळेवर पगार थेट शिक्षकांच्या बँक खात्यावर जमा होत होता. मात्र आता पुन्हा पगार विलंबाने यायला सुरुवात झाली आहे. शासनाकडून पगारासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा 46 कोटी रुपयांची आवश्यकता असते. परंतु यावेळी 32 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. 14 कोटी रुपये अनुदान कमी आल्याने महाड, कर्जत, पेण आणि श्रीवर्धन या चार तालुक्यातील शिक्षकांचे पगार अद्याप झालेले नाहीत. या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांची भेट घेतली. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष विजय पवार, जिल्हा कार्यवाह गजानन देवकर, संघटन मंत्री वैभव कांबळे, राजेंद्र नाईक, महेंद्र सातमकर,गजानन दांडेकर, बालाजी गुबनारे उपस्थित होते. आजच्या आंदोलनानंतर आता सर्व तालुक्यात तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही शिक्षकांचे पगार वेळेवर झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश सुर्वे यांनी दिला आहे.

Exit mobile version