वेतन पथकातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची सुचना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वेतन पथकातील रिक्त जागी आलेले अधिकारी पदभार स्विकारत नसल्याने ऐन गौरी गणपतीच्या तोंडावरच माध्यमिक शिक्षकांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करीत रिक्त पदे भरुन गणपती पुर्वी शिक्षकांना पगार करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. या संदर्भात पंडित पाटील यांनी शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्यासोबत संपर्क साधून चर्चा केली.
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार पैसे जमा असताना देखील वेतन पथकात रिक्त पदे असल्याने होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे ऐन गणपतीच्या तोंडावर शिक्षकांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत. अनेक वेळा मागणी करुन देखील पगार होत नसल्याने शेवटी शिक्षकांनी शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्यांशी संपर्क साधून पगार करण्यासाठी शासनाला कार्यवाही करण्याबाबत साकडे घातले. त्यानुसार पंडित पाटील यांनी शिक्षण संचालक तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्याशी संपर्क साधला. शिक्षकांना जर तात्काळ पैसे दिले नहाी तर जिल्हा परिषदेला धडा शिकवावा लागेल असा इशारा देखील पंडित पाटील यांनी यावेळी दिला.
शिक्षणाधिकारी फणसे यांना संपर्क साधत जर अधिकारी पदभार स्विकारत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा पण शिक्षकांना वेठीस धरणे योग्य नाही असेही त्यांनी सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी तात्काळ वेतन पथक अधीक्षकांची नेमणूक करण्यासाठी आजच्या शिक्षण उपसंचालक यांच्याशी बोलून समस्या सोडवण्यासाठी नक्की मदत करणार व गणेशोत्सापूर्वी शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगितले.