गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची ‌‘शाळा’

| महाड | वार्ताहर |

विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावेत, यासाठी शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना ‌‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाड तालुक्यात तीन ठिकाणी नुकतेच शिबिर संपन्न झाले असून आतापर्यंत सुमारे 600 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

तालुक्यात प्रशिक्षणाला महिनाभरापूर्वी सुरुवात झाली असून कोकरे, बिरवाडी येथे हे प्रशिक्षण पार पडल्यानंतर महाड नगरपालिका शाळा क्र.5 येथे 17 डिसेंबरला उर्वरित शिक्षकांसाठी शिबिर घेण्यात आले. या वेळी 180 शिक्षक उपस्थित आहेत. आतापर्यंत सुमारे 600 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. विस्तार अधिकारी राजन सुर्वे यांनी, प्रशिक्षणामागचा उद्देश व भविष्यात याचा होणारा फायदा याबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद तसेच नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच काळानुसार विद्यार्थी व शिक्षण प्रक्रिया ही बदलत आहे. बदलत्या काळानुसार अध्यापन कौशल्यातही बदल करावे लागणार आहेत, यासाठी योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात, याबाबतची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात कशाप्रकारे करावी तसेच ही कौशल्ये आत्मसात करून नवीन विद्यार्थी एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी तयार होतील, या दृष्टीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेकदा शिक्षक मुलांना एकतर्फी शिक्षण देत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अजिबात रस नसतो. त्यामुळे मुले स्वतःहून कशाप्रकारे शिकतील, त्यांच्यातील जिज्ञासूवृत्ती कशी विकसित होईल आणि येणारी आव्हाने पेलण्यास विद्यार्थी कशाप्रकारे तयार होतील, या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी स्वयंप्रेरित केले जाणार आहे. या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व अंगाने विचार करूनच या प्रशिक्षणाची रचना केली आहे. शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या व विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने शिक्षकही विकसित व अद्ययावत होणे गरजेचे आहे, याचाही विचार यातून होणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मुले एकमेकांच्या सहकार्याने शिकली पाहिजेत तसेच मुलांच्या अध्ययनाची गती कशी वाढून मुले शिकण्यात पुढाकार कशी घेतील या बाबींचा विचार देखील या प्रशिक्षणातून पुढे येणार आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल, नवनवीन संशोधनाचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना प्रशिक्षणातून सक्षम होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे.

जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. याचा उपयोग ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होईल. दोन दिवस शिक्षकांनी या प्रशिक्षणाला चांगली हजेरी लावली आहे.

राजन सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी, महाड
Exit mobile version