| माणगाव | प्रतिनिधी |
शैक्षणिक क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवून ज्ञानवृद्धीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित व वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव च्या रायगड विभागातील सहा शाळांचे एकत्रीकरण अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द येथे रविवार, दि. 15 मार्च रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
ज्ञानरचनावादी दृष्टिकोन ठेवून अध्ययन, अध्यापनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांचा प्रतिवर्षीप्रमाणे एकत्रीकरणाचा 26 वा मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिक्षण मंडळाच्या रायगड जिल्ह्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड, अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द, सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी, गोळेगणी पंचक्रोशी संचालित विद्यालय गोळेगणी, वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव या सहा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या एकत्रिकरणात सहभागी झाले होते.
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सरचिटणीस डॉ.निलेश रेवगडे, चिटणीस नीला दामले, सदस्य मिलिंद कुलकर्णी, किशोर आल्हाट, सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, कुटुंब प्रबोधन गतिविधि प्रमुख सचिन जोगळेकर, सायली जोगळेकर, माजी मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे, आवटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या एकत्रीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवान व स्वागतगीत सादर केले. या एकत्रीकरणात कुटुंब प्रबोधनात्मक माहिती, कुटुंबाचे महत्व या विषयावर राष्ट्रसेविका समिती कुटुंब प्रबोधन गती विधी जिल्हा संयोजक तथा रोहा तालुका बौद्धिक प्रमुख सायली सचिन जोगळेकर यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंब व हरित घर इत्यादी बाबत त्यांनी माहिती दिली. समारोपीय सत्रात डॉ. निलेश रेवगडे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हाने याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे यांनी उद्घाटनीय सत्रात प्रास्ताविक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कृष्णा महाडिक यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या एकत्रीकरणाच्या निमित्ताने सर्व शिक्षक, कर्मचारी यांची अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत 14 शिक्षकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शिक्षिका विद्या शिर्के प्रथम क्रमांक, गुरुप्रसाद गेजगे द्वितीय क्रमांक, डॉ. शारदा निवाते तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या एकत्रीकरण मध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले. मुख्याध्यापक भरत काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्तम नियोजनातून स्नेहमेळावा अत्यंत आनंददायी झाला.







