टीम इंडिया -विंडीज आजपासून वनडे मालिका

भारताचा 1000 वा सामना
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे इक्वेशन कसे असणार हा चर्चेचा विषय आहे. असे असले तरी या दोघांनाही फलंदाजीची जोडी म्हणून एक मैलाचा दगड पार करण्याची संधी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमधील नात्याची चर्चा कायम होत असते. मात्र या दोघांनी फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी हे दोन स्टार फलंदाज एकत्र क्रीजवर असतात त्यावेळी विरूद्ध संघावर प्रचंड दबाव निर्माण करतात.


विराट-रोहित जोडीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 4906 धावांची भागीदारी रचली आहे. त्यांना 5000 च्या क्लबमध्ये सामिल होण्यासाठी फक्त 94 धावांची गरज आहे. ते सध्या वनडेमध्ये सर्वाधिक भागीदारीतल्या धावांच्या यादीत आठव्या क्रमाकावर आहेत. या यादीत सर्वात टॉपवर सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांची जोडी आहे. त्यांनी 176 डावात 8227 धावा केल्या आहेत.
विराट-रोहित जोडीच नाही तर रोहित-शिखर जोडी देखील वनडेमध्ये भागीदारी रचण्यात आघाडीवर आहे. 5000 धावांची भागीदारी रचणार्‍यांच्या यादीत भारताची ही दुसरी जोडी आहे. त्यांनी 112 डावात 5023 धावा केल्या आहेत. मात्र विराट-रोहित जोडीची बातच काही और आहे. कारण या जोडीने भागीदारीच्या 5000 धावा पूर्ण केल्या तर ही जोडी भागीदारीत सर्वात वेगवान 5000 धावा करणारी जोडी ठरणार आहे. त्यांनी 81 डावात 4906 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी देखील 64.55 इतकी आहे. बाकीच्या सर्व जोड्यांनी वनडे क्रिकेटमध्ये भागीदारीत 5000 धावा करण्यासाठी 100 पेक्षा जास्त डाव घेतले आहेत.

सचिनला सामन्याची उत्सुकता
भारतीय संघ रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधील एक हजारावा सामना खेळणार आहे. आतापर्यंतच्या भारताच्या 999 एकदिवसीय सामन्यांपैकी सर्वाधिक 463 सामन्यांमध्ये सचिनने प्रतिनिधित्व केले आहे. 1991मध्ये आर्थिक उदारीकरण झाले, याच काळात तेंडुलकर नावाचा ब्रँड उदयास आला.

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी बाळगले होते, हे मी पूर्णत: मान्य करतो. माझ्या बालपणीच्या काळात कसोटी क्रिकेटला अतिशय महत्त्व होते. पण एकदिवसीय क्रिकेटमध्येही छाप पाडण्यासही मी उत्सुक होतो. – सचिन तेंडूलकर, क्रिकेटर

Exit mobile version