द्रविडचे मार्गदर्शन अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरूवात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर टीम इंडिया आता नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. ट्वेंटी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराटने टीम इंडियाच्या ट्वेंटी 20 संघाचे कर्णधारपद सोडले आणि रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. या जोडीला आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले असले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अनेक ऐतिहासिक मालिका जिंकल्या. आता राहुल द्रविड हा मुख्य प्रशिक्षक आणि रोहित शर्मा हा कर्णधार असे नवे पर्व सुरू झाले आहे. या दोघांच्या नव्या इंनिंगची कसोटी न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्याच मालिकेत लागणार आहे. मंगळवारी राहुल व रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने सरावाला सुरूवात केली.
17 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या तीन ट्वेंटी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाने सरावाला सुरूवात केली आहे. न्यूझीलंडचे खेळाडू सोमवारी भारतात दाखल झाले. ट्वेंटी 20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात दोन्ही राष्ट्रांनी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. भारताकडून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी 20 मालिकेत खेळणार नाहीत, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियन्सन याने कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. पण न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील फॉर्म कायम राखून टीम इंडियाला कडवे आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
भारतीय टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.