| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सिल्हेट येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार साऊदीने पहिल्या कसोटी सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा कर्णधार टीम साऊदी हा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
साऊदीच्या आधी न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हॅडली आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या नावावर हा विक्रम होता. हॅडलीने 86 कसोटी सामन्यांत 431 गडी बाद केले आहेत. त्याने किवी संघासाठी 27.16च्या सरासरीने 3,124 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याच्या 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय डॅनियल व्हिटोरीने 113 कसोटी सामन्यांत 362 बळी घेत 30.00च्या सरासरीने 4531 धावा केल्या आहेत. त्याने किवी संघासाठी सहा शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत