हजारो शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोराच
| महाड | प्रतिनिधी |
शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करत असताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आजही हजारो शेतकऱ्यांचा सातबारा कोराच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शासनाने योग्य ती दखल घेऊन मुदत वाढवण्याची मागणी किसान क्रांती संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात घेतलेल्या पिकांची नोंद डिजिटल स्वरूपात सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी एक प्रक्रिया सुरु केली आहे. याचा उपयोग सरकारी योजना, पीक विमा आणि अनुदानासारख्या गोष्टींसाठी होणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागते. या ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणी करत असताना अनेक अडचणी येत आहेत. गट क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत असताना, ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ही पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आणि शासनाने दिलेले अंतिम मुदत यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. याबाबत शासकीय स्तरावरदेखील तक्रारी करण्यात आलेल्या असून, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शासकीय स्तरावरून सांगण्यात येत आहे. प्रक्रियेतील अडथळे दूर झाले नाही तर शेतकऱ्यांचा सातबारा कोराच राहण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ई-पीक पाहणी हा कार्यक्रम आता महसूल विभागामार्फत राबवला जात असून, त्यामध्ये काय तांत्रिक अडचणी आहेत, या पाहून सोडवण्याचा प्रयत्न करू, असे तालुका कृषी अधिकारी श्री. धीरज तोरणे यांनी सांगितले.
महाड तालुक्यामध्ये आजही हजारो शेतकरी ई-पीक पाहणीपासून वंचित आहेत. मोबाईल ॲपद्वारे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि आजही अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याने पीक पाहणी करता येत नाही.
सुहास दत्ताराम पवार,
शेतकरी
शासनाने या अडचणी दूर करून द्याव्यात किंवा ई-पीक पाहणी कार्यक्रमाची मुदत वाढवावी.
तुकाराम देशमुख,
अध्यक्ष, किसान क्रांती संघटना







