| नागोठणे | वार्ताहर |
आयटीआच्या विविध व्यवसायातील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रात्यक्षिक शिकविण्यात येत असते. आयटीआयच्या एक-दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना जे शिकायला मिळते, त्याचे कुठेतरी व कोणाकडे तरी प्रदर्शन व्हावे, विद्यार्थ्यांच्या डोक्यातील विचार मनसोक्तपणे बाहेर पडावे यासाठी हे तंत्र प्रदर्शन महत्त्वाचे असल्याचे मत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नितीन चौधरी यांनी आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेमध्ये मंगळवारी (दि.24) संपन्न झालेल्या तंत्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
नितीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला नागोठणे आयटीआयच्या औद्योगिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व खोपोली येथील थरमॅक्स कंपनीचे एचआर प्रमुख सुनील कदम, धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनीचे एच.आर विभागाचे प्रमुख शांताराम सोनवणे इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख सुरेश हुंबरवाडी, रैना इंजिनिअरिंग कंपनीचे रामावतार मोदी, नागोठणे प्राचार्य विद्या पाटील, पनवेल आयटीआयचे उपप्राचार्य विजयकुमार टिकोले, गटनिदेशक संदीप वेले, म्हसळा आयटीआयचे प्रभारी प्राचार्य एस.आर. जोशी, तळा आयटीआयचे प्रभारी प्राचार्य एस. एन. शेरे, पनवेल आयटीआयचे दीपक बाक्कर, नागोठणे आयटीआयचे गटनिदेशक सिद्धार्थ भगत आदींसह तंत्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील 14 आयटीआयचे निदेशक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जिल्ह्यातील 14 आयटीआयमधील 48 प्रकल्प ठेवण्यात आले होते. यामध्ये नागोठणे आयटीआयच्या थर्ड आय ब्लाइंड या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. तर खालापूर आयटीआयच्या कुशन अँड ज्वेलरी एम्ब्रॉयडरी या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक व उरण आयटीआयच्या चिलर एसी प्लांट प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात थरमॅक्स कंपनीचे सुनील कदम, सुदर्शन कंपनीचे शांताराम सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांनामार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागोठणे आयटीआयच्या प्राचार्य विद्या पाटील यांनी व सूत्रसंचालन निदेशक नरेंद्र वारे यांनी केले. या तंत्र प्रदर्शनासाठी थरमॅक्स खोपोली, सॉलवे धाटाव, मेगा पाईप्स पाली या कंपन्यांनी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून सहकार्य केले. हे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी नागोठणे आयटीआयमधील सर्व व्यवसायाचे निदेशक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.







