ग्रामीण भागातील शाळांना 50 कॉम्प्युटरचे वाटप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या युगात संगणक साक्षर बनविण्यासाठी प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील विविध शाळांना मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटरचे वाटप केले. ग्रामीण, दुर्गम भागातील शाळा डिजिटल बनवून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संगणक तज्ज्ञ बनविण्यात येणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती अत्यंत गरजेची आहे. हे ओळखून पीएनपी शैक्षणिक संस्थेने आणि पीपीएफएस म्युचल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तंत्रज्ञान शिक्षणावर भर देण्यासाठी शाळांना संगणक संच सुपूर्द केले आहेत.
पीएनपी संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात दुर्गम भागातील शाळांना संगणक संच वाटप सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या कार्यवाह, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील , कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड शैलेंद्र पांडे , चिफ मार्केटिंग ऑफिसर जयंत पै , संस्थेचे विश्वस्त सुमेध खैरे, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर अमित देशपांडे आणि ग्रामीण भागातील शाळांचे मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक यावेळी सभागृहात उपस्थित होते.
शैक्षणिक आणि स्पर्धेच्या युगात विज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान महत्वाचा भाग ठरत आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी त्यांना संगणकीय ज्ञान देणे महत्वाचे आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रमातील शिक्षण देण्याबरोबरच संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायला हवे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यास यशाचे शिखर गाठणे सहज शक्य होईल. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल करू शकतात. यामुळे आता स्पर्धेच्या युगात आस्तित्व टिकवायचे असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान द्यायला हवे असे प्रतिपादन पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या कार्यवाह, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख नव्याने करून देण्याची गरज राहिली नाही. पण ग्रामीण भागात ही उणीव प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल तंत्रज्ञानाचे उत्कृष्ठ ज्ञान आहे परंतु मोबाईल तंत्रज्ञानाचे दूरगामी परिणाम जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांना संगणकीय तंत्रज्ञानाचे महत्व समजावून प्रशिक्षित करणे हि काळाची गरज आहे. यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या माहितीची कवाडे विद्यार्थ्यांसाठी उघडी करा. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडविण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक करतात. यासाठी शिक्षकांनी शिकविण्याचा आनंद घेतला तरच विद्यार्थी शिकण्याचा आनंद घेतील असे मत चिफ मार्केटिंग ऑफिसर जयंत पै यांनी मांडले.
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. या शैक्षणिक बदलाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्ञानाधिष्ठित शिक्षण हि आपली शैक्षणिक परंपरा आहे. आता वाढलेल्या स्पर्धा यामुळे शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाला अधिक महत्व येऊ लागले आहे. तंत्रज्ञानाचे युग असल्याने आता पुस्तकाची जागा संगणकाने घेतली आहे. असे असले तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धा जिकंण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरोबरच तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यासाठीचे शैक्षणिक नियोजन करायला हवे असे मत कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड शैलेंद्र पांडे यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाची सांगता आभार चिफ ऑपरेटिंग ऑफिसर अमित देशपांडे यांनी केली.