टेकडी चढण्याचे कष्ट थांबले
| नेरळ | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले होते. मात्र, अनेक महिन्यांपासून नवीन प्रशासकीय भवनात कामकाज सुरू झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीचे कामकाज याच प्रशासकीय भवनामधून झाले होते आणि त्यामुळे कार्यालय या ठिकाणीच सुरू करावे, अशी मागणी वाढली होती. अखेर या कार्यालयात तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
टेकडीवर तहसील कार्यालय असल्याने शहराप्रमाणे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. टेकडीवर कार्यालय असल्याने गोरगरिबांना रिक्षाने जावे लागते. एका कामासाठी तासंतास फुकट जात असल्याने काम होईपर्यंत उपाशीपोटी थांबावे लागत होते.
तहसील कार्यालयात सर्वच स्तरातील नागरिक येत असतात. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शबरी योजना, निराधार योजना, राजीव गांधी योजना, फ्लॅट, जमीन जागेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, स्टॅम्प भरण्यासाठी तर काही तक्रार देण्यासाठी असे विविध कामांसाठी वयस्कर (वयोवृध्द), विद्यार्थी, महिला वर्ग येत असतात. तर, उपविभागीय कार्यालय श्रीराम पुला पलीकडे असल्याने नागरिकांना उलटा फेरफटका मारावे लागत असल्याने पैसा आणि वेळ जात आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असे सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीत निवडणुकीचे काम सुरू होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तहसील कार्यालय आणि उपविभागातील सर्व फाईल, सामान हलविण्याचे काम सुरू केले आणि यापुढे प्रशासकीय कार्यालयात सारा कारभार होणार आहे. प्रथम उप विभागीय अधिकारी यांनी आपले कार्यालय या ठिकाणी सर्वात आधी सुरू केले असून तेथे सर्व दैनंदिन कामे सुरू आहेत. उप विभागीय कार्यालय हे प्रशासकीय भवन मध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे.
एकाच ठिकाणी कार्यालय येणार असल्याने सरकारी कामानिमित्त येणाऱ्यांची दमछाक होणार नाही. छोटी मोठी सर्व कामे लवकर होतील. याठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्यांचा फायदा तालुक्यातील सर्व जनतेला होऊ शकतो.
अजित नैराळे, उप विभागीय अधिकारी