। म्हसळा । वार्ताहर।
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची आणि काजू लागवडीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तहसीलदार सचिन खाडे यांनी पाहणी करून लाभार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
रेवली येथील घनदाट जंगलात जाऊन काजू लागवड आणि त्यांचे संगोपन कसे करायचे तसेच कोणत्या मोसमात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करायचा याबाबत तालुका कृषी अधिकार्यांकडून माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाचे औचित्य साधून तहसीलदार खाडे यांनी रेवली येथील घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांच्या समवेत कृषी अधिकारी सुजय कुसाळकर, पोलीस पाटील अनंत पाटील, अनिल टिंगरे, विठोबा पाटील, सचिन धोंगडे, अरुणा कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला असून त्याची अंमलबजावणी तालुक्यात यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन खाडे यांनी केले.