आदिवासी समाजाचा आरोप: आदिवासींचा जंगल बचाव ; आदिवासी बचावचा नारा
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात येणार्या पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यामुळे माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. मात्र, माथेरान बचाव समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात माथेरान येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासीदेखील आक्रमक झाले असून, जंगल बचाव – आदिवासी बचाव अशी भूमिका आदिवासी संघटनेने घेतली आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणार्या पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी माथेरान मधील व्यावसायिक आणि नागरिकांकडे पोहचल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माथेरान पर्यटन बचाव समिती कडून या पर्यटक फसवणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, माथेरान पर्यटन बचाव समितीने 17 मार्च ची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे. त्या माध्यमातून माथेरान बचाव समिती कडून जे निवेदन प्रशासनाला दिले आहे. त्यात 17 वा मुद्दा आदिवासी समाजाबद्दल असल्याने माथेरान बंदच्या बाबत गदारोळ आहे. माथेरान पर्यटन बचाव समितीच्या निवेदनात दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या दरम्यान व्यवसाय करणारे आदिवासी लोकांचे स्टॉल हटविण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
त्याबाबत माथेरान शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या असून, त्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. असे असतानादेखील आदिवासी लोकांविषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणार्या माथेरान पर्यटन बचाव समिती विरुद्ध आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आदिवासी समाज हा डोंगर पट्ट्यात राहत असून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार करतात.
माथेरानमध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना दीडशे वर्षांपासून घोडे चालवणे, दूध व्यवसाय, जंगली मेवा विकण्याचे व्यवसाय करीत आहेत. असे असतानादेखील माथेरानमधील बचाव समिती आदिवासी लोकांच्या मुलावर उठली असून त्यांचा रोजगार हिरवण्याचा विचार करीत आहे. हे चुकीचे असून माथेरान मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर दुकाने थाटली आहेत. त्यांचे काय? असा प्रश्न पारधी यांनी उपस्थित केला आहे.
दस्तुरी नाका ते अमन लॉज स्टेशन या रस्त्यालगतचे विक्रेते हटवावेत. मुळात हे विक्रेते आपल्या माथेरान शेजारील परिसरातील आदिवासी बांधव आहेत. त्यांचे घर या छोट्याशा धंद्यांवर चालत आहे. जर ते अतिक्रमण करून व्यवसाय करत असतील. तर माथेरानमध्ये अमनलॉजपासून माथेरानपर्यंत नागरिक रस्त्यालगत व्यवसाय करतात. मग ते अतिक्रमण नाही का. यावरून असे दिसते की माथेरान येथे फक्त माथेरानमधील नागरिक व्यवसाय करू शकतो बाहेरील नागरिकांनी येथे व्यवसाय करायचा नाही, असा प्रश्न टॅक्सी संघटनेचे माजी अध्यक्ष सनी चंचे यांनी माथेरानकरांना विचारला आहे.