। मुंबई । प्रतिनिधी ।
धारावीचा घोटाळा कदाचित जगातील सर्वात मोठा घोटाळा असून पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. परंतु जात, पात, धर्म, राजकीय भेदभाव विसरून मुंबईच्या सन्मानासाठी रस्त्यावर, मतदान केंद्रांवर उतरून लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. ते मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात बोलत होते.
मुंबई लुटता यावी म्हणून तुम्हाला अनेक आमिषे दिली जातील. पैसे, पदांची लालुच दाखवली जाईल. तुम्ही विकले जाणार की मुंबईसाठी लढणार, असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. तसेच, एकदा का मुंबई अदानीच्या हातात गेली तर मुंबईकरांचे स्वप्न चिरडले जाईल. त्यासाठी मी एकटा उरलो तरी लढेन. रक्तबंबाळ होईपर्यंत लढेन, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या निर्धार शिबीरात केला.
धारावीतील दीड लाख कुटुंबांना अपात्र ठरवून बाहेर पाठवणार आणि मुंबईचा पुनर्विकास अदानी आपल्या हातात घेणार. धारावीसह मुंबईतील 1 हजार 80 एकरमध्ये कुणाला काही करायचे असले तर पालिकेला किंवा सरकारला विचारायचे नाही तर भाजपच्या एकमेव मालकाला म्हणजे अदानीला विचारावे लागेल. तुमची इमारत बांधायची असेल तर पहिला 50 टक्के टीडीआर अदानीकडून विकत घ्यावा लागेल. अदानीला वाटले तर त्या जमिनीवर विमानतळही बांधू शकतो. त्यासाठी राज्याच्या सरकारच्या परवानगीची गरज नाही. अशा रीतीने मुंबईला लुटू द्यायचे का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.