लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी बेणसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली होती. त्यांनी 1 एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसर्या दिवशी बुधवारी (दि.2) पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेणसे सिध्दार्थ नगर येथील उपोषकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार शेजाळ यांनी दिले आहे.
बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स नागोठणे कंपनी नवा प्रकल्प उभारणार आहे. त्याचवेळी ज्या जमिनीवर प्रकल्प उभारणार त्या स्थानिकांना, भूमिपुत्रांना, प्रकल्पबाधितांना अजून विश्वासात घेतलेले नाही. त्यांच्या मागण्यांना तोंडी आश्वासने दिली असली तरी अजून मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास आंदोलक व्यक्त करीत आहेत.
बेणसे सिध्दार्थ नगर येथील उपोषकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून रिलायन्स व्यवस्थापनाच्या अधिकार्यांशी देखील बोलणी केली. निर्णय क्षमता असलेले अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन मागण्यांवर चर्चा करावी आणि विषय मार्गी लावावा, असे पत्र रिलायन्स व्यवस्थापनाला दिले आहे.
तानाजी शेजाळ,
तहसीलदार, पेण