। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरिय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमधील राजस्व सभागृहात सोमवारी (दि.7) तक्रारदारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील रस्ते, पाणी व इतर प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी शासनाने जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी दिली. त्यामुळे येत्या सोमवारी दुपारी एक वाजता राजस्व सभागृहात लोकशाही दिन सुरु होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग, रस्ते पाणी, अतिक्रमण, भ्रष्टाचार अशा अनेक प्रकारचे प्रश्न आजही शासन दरबारी प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारी कार्यालयात तक्रारदारांना चपला झिजवाव्या लागल्या आहेत. लोकशाही दिनाच्या मार्फत जनतेचे अनेक प्रश्नांची सोडवणूक जागेवर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपुर्वी लोकशाही दिन आयोजित केला होता. वेगवेगळ्या विभागाला सुचना करून तक्रारींचे निरसन करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, आजही हे प्रश्न अधिकार्यांच्या टेबलावर धुळ खात पडून आहेत. त्यामुळे सोमवारी होणार्या लोकशाही दिनामध्ये तक्रारदारांचे प्रश्न सोडविण्यास जिल्हाधिकारी यशस्वी ठरतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.