कामानिमित्त येणाऱ्याला ताटकळत ठेऊ नका

तहसीलदारांनी भरला कर्मचाऱ्यांना दम

| वावोशी | वार्ताहर |

सरकारी कार्यालयात कामानिमीत्त मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र काही कर्मचारी त्यांना ताटतळत ठेवतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन कारावा लागतो. यासाठी आता स्वतः तहसिलदार आयुब तांबोळी यांनी पुढाकार घेत नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, असा दम त्यांनी कर्मचाऱ्यांना भरला आहे.

कामानिमित्त तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तहसील कार्यालयात आलेल्या लोकांची कामे तात्काळ झाली पाहिजेत. काही अडचणी असतील, तर मी कार्यालयात बसलेलो आहे. प्रत्येकाचे समाधान झालेच पाहिजे, जेवढे काम करता येईल तेवढे काम करून लोकांचे समाधान करणे आपले कर्तव्य असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. विनाकारण लोकांना छोट्या कामासाठी कोणी तासंतास ताटकळत ठेवले, तर मात्र मी ते खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या खालापूर तालुक्यातील 22 ग्राम पंचायतीच्या निवडणूकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यावेळी जातीच्या दाखल्यासाठी किंवा ते तपासण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली आहे. सर्वच लोकांना ते काम कसे करायचे याची माहिती नसते. त्यामुळे लोकांच्या मनात भिंती निर्माण झालेली असते. त्यातच एखाद्या कामासाठी त्यांना तासंतास थांबावे लागले, तर त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना आवश्यक असणारे कागदपत्र वेळेवर मिळाले नाही, तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामात सतर्कता बाळगली पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यालयात आलेल्या नागरिकांची त्यांनी स्वतःहून विचारणा केली.

दरम्यान, तांबोळी यांनी खडसावल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा आपल्या कामातील वेग वाढल्याचेही दिसून आले.

Exit mobile version