मासिक बजेटच कोलमडले
जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला
। अलिबाग । दिव्या तानवडे ।
वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले असून, मासिक बजेटवरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे. जीवनाश्यक वस्तुंचेही दरही गगनाला भिडू लागले आहे. भाजीपालाही आता मोजकाच घेणे भाग पडत असल्याने जगायचं कसं याची चिंता सर्वसामान्यांना लागलेली आहे.
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहर आणि परिसरातील वाहनचालक,व्यावसायिक,हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला असता सर्वांनीच डोक्यात हात मारुन घेत तुम्हीच सांगा आम्ही जगू कसं अशी संतप्त विचारणा केली. गेल्या 15 दिवसात 13 वेळा दरवाढ करण्यात आली आली असून बुधवारी 6 एप्रिलला पेट्रोल प्रतिलिटर 120.59 आणि डिझेल प्रतिलिटर 104.95 असा आहे.
मासिक बजेटवर परिणाम
इंधन दरवाढीचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवरच झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.मासिक खर्च भागवितांना कुटुंब प्रमुखांना विशेष करुन महिलांना कसरतच करावी लागत आहे.आधीच कोरोनाच्या साथीने हैराण करुन सोडले होते.त्यातून सावरत असतानाच इंधन दरवाढ होऊ लागल्याने दैनंदिन खर्च भागवितांना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे.जीवनाश्यक वस्तू,भाजीपाला यांच्या दरातही भरमसाठ वाढ होऊ लागलेली आहे.
कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर सर्वांचाच जीवनप्रवास आधीसारखा सुरु झाला. सर्वांनी कामाधंद्याला जात आपलं दैनंदिन जीवनाला सुरूवात केली, गाड्यांचा वापर वाढला. परंतू, दर दिवसाला पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आता आमच्या सामान्यांच्या खिशाला न परवडणार्या आहेत. -धीरज तुणतुणे, विद्यार्थी.
पेट्रोलच्या किमती वाढ झाल्यामुळे दिवसाला 200 रु. पेट्रोल परवडण्यासारख नाही आहे, तरी सरकारणे 60 /70 रु करावे. -अजय पाटील
मोदी सरकार यांना निवडूण आणल्यापासून महागाई खूप वाढली आहे. पेट्रोल-डिझेल भाव तर विचारायलाच नको. गॅसच्या किमती पण खूप वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. – सतिश प्रधान,उद्योजक
पहिला 450 पेट्रोल मध्ये एक आठवाडा जायचा पण आता 600रु मध्ये आठवडा जातो. ही महागाई गगनाला पोहोचली आहे. – सुचिता वाडकर,नोकरदार
