। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात तापमान वाढलं आहे. महाराष्ट्रासह रायगडही होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात 49 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उष्माघाताचा पहिला बळी सोयगावमध्ये गेला आहे. होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे. तापमान असल्यामुळे हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
2 एप्रिलपासून अलिबाग तापणार
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात येत्या 2 एप्रिलपासून तापमान वाढण्याची शक्यता आहे. अॅक्यू वेदर संस्थेने दिलेल्या अहवालानूसार, या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान 36 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या अलिबागचे तापमान साधारण 33 च्या आसपास आहे. हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल. 31 मार्चपर्यंत 35 पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल 1 ते 6 दरम्यान काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 32.5 आणि सांताक्रूझ वेधशाळेत 33.5 नोंदवले गेले.
आरोग्य विभाग लागले कामाला
उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्याची गरज असून उघड्यावर काम करणार्या कामगारांसाठी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेडची व्यवस्था करण्याची सुचना जिल्हा आरोग्य अधिकार्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उष्माघात केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
खासगी टँकरने होतोय पुरवठा
उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. पाणी पातळीत घट होत आहे. जिल्हयातील धरणांमध्ये 46 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी देखील आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. काही ठिकाणी एक दिवस तर काही ठिकाणी दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील रेवसमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला
असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
धरणातील पाणीसाठा लघु पाटबंधारे योजनांची नावे सध्याचा पाणीसाठा फणसाड - 47 टक्के वावा - 68 टक्के सुतारवाडी - 68 टक्के आंबेघर - 78 टक्के श्रीगांव - 37 टक्के कोंडगांव - 37 टक्के घोटवडे - 28 टक्के ढोकशेत - 15 टक्के कवेळे - 33 टक्के उन्हेरे - 26 टक्के कार्ले - 52 टक्के कुडकी - 49 टक्के रानीवली - 13 टक्के पाभरे - 63 टक्के संदेरी - 59 टक्के वरंध - 36 टक्के खिंडवाडी - 37 टक्के कोथुर्डे - 22 टक्के खैरे - 36 टक्के साळोखे - 38 टक्के अवसरे - 58 टक्के भिलवले - 66 टक्के कलोते- मोकाशी - 58 टक्के डोणवत - 44 टक्के मोरंबे - 62 टक्के बामणोली - 62 टक्के उसरण - 63 टक्के पुनाडे - 61 टक्के
कोकणात 20 गावे, 83 वाड्यांवर पाणीसंकट
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील एकूण 20 गावे व 83 वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासकिय अहवालानूसार त्यांना 38 खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट होते.







