24 तासांत आरोपी जेरबंद
। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर परिसरातील हनुमान मंदिर आणि गणपती मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनांचा अवघ्या 24 तासांत उलगडा करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. किशन राधेश्याम गंगावणे (38) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मूर्ती चोरीचे दोन आणि अन्य चार असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
खारघर पोलीस ठाण्यात हनुमान मंदिर आणि गणपती मंदिरातील मूर्ती चोरीची नोंद करण्यात आली होती. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संशयिताची ओळख पटवून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.
आरोपी किशन राधेश्याम गंगावणे हा खारघर सेक्टर 10 मधील कोपरा गावच्या स्मशानभूमीजवळ राहतो. त्याचे मूळ गाव शिवनी शिवापूर, ता.मंगरूळपीर, जिल्हा वाशिम असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून खारघर पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 24 तासांत मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनांचा छडा लावला. तसेच, अन्य चार गुन्ह्यांचीही उकल करण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.
