मोदींच्या केदारनाथ दौर्‍याला मंदिर पुरोहितांचा विरोध

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ दौरा करणार असून त्यांना तेथील पुरोहितांनी विरोध केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी याप्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला तरीही विरोध कायम असून दौर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धाम येथे शंकराचार्य समाधीच्या लोकार्पण सोहळ्याला जाणार आहेत. मात्र, पुरोहित आणि पंड्यांनी त्याला विरोध केला आहे. मागील वर्षी स्थापन करण्यात आलेल्या चार धाम देवस्थानम बोर्ड स्थापन केल्याने हक्क गमावलेल्या पुरोहितांना भाजपविरोधात बंड पुकारले आहे. बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पंतप्रधानांच्या दौर्‍याचा विरोध करणार्‍या पुरोहितांची समजूत घालण्यासाठी केदारनाथ धाममध्ये गेले. त्यांनी बंद खोलीत बराच वेळ पुरोहितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरोहित आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धन सिंह रावत यांच्यासहीत भाजप प्रदेशाध्यक्ष केदारनाथच्या दर्शनाला गेले होते. मात्र, त्यांना पुरोहितांनी दर्शन घेऊ दिले नाही. तब्बल सात तास ते केदारनाथ धाममध्ये होते. तरीही त्यांना दर्शन घेऊ दिले नाही. त्यानंतर पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्‍याचाही असाच विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला.

Exit mobile version