| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथे रविवारी (दि.12) मोठ्या संख्येने पर्यटक वर्षासहलीसाठी आले होते. सायंकाळी माथेरान- नेरळ असा प्रवास करीत असताना वाहने मिळत नव्हती आणि काही पर्यटक टेम्पोमधून नेरळ येथे येत होते. त्या टेम्पोला माथेरान घाटात अपघात झाला आणि त्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून, त्या टेम्पोमध्ये 17 ते 18 पर्यटक प्रवास करीत होते.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रविवारी पर्यटकांनी फुलून आले होते. त्यावेळी पर्यटक यांना सायंकाळी येताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. तेथे किमान दीड ते दोन तास टॅक्सी मिळावी यासाठी वाट पाहावी लागत होती. पर्यटकांच्या रांगा लांबत चालल्या होत्या आणि त्यामुळे अखेर पर्यटकांना मिळेल त्या वाहनांचा सहारा घेऊन नेरळ येथे यावे लागत होते. प्रवासी टॅक्सी यांची गर्दी आणि त्यात पर्यटकांची वाहनांमुळे माथेरान- नेरळ घाट पर्यटकांनी व्यापून गेला होता. वाहनांची वाट पाहत असलेल्या पर्यटकांनी माथेरान येथून खाली नेरळ येथे जात असलेल्या टेम्पोचा सहारा घेतला. मालवाहू टेम्पो या वाहनातून त्यावेळी साधारण 17 ते 18 प्रवासी प्रवास करू लागले आणि हा टेम्पो त्या प्रवाशांना घेऊन नेरळ कडे येऊ लागला. नेरळ कडे येत असताना जुम्मापट्टी नंतर रस्त्यावरून पुढे येत असताना रस्त्याच्या एका कडेला कलंडला आणि त्या टेम्पोला अपघात झाला.
रस्त्यावर उलटा झालेल्या टेम्पो मध्ये प्रवास करीत असलेले 17 ते 18 पर्यटक यांच्यापैकी सात ते आठ जण जखमी झाले. त्यावेळी नेरळ टॅक्सी संघटनेचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पलटी झालेला टेम्पो सुस्थितीत आणण्यासाठी आणि जखमींना उपचारासाठी तत्काळ सेवा देण्याचे काम केले. त्या जखमी प्रवाशांना गाडी मधून डॉ. सरोदे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्या टेम्पो मधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने अद्याप पोलिसांना आपले जबाब दिले नाहीत. त्यामुळे नेरळ पोलिसांकडून होणारी कार्यवाही अर्धवट राहिली असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आज सकाळी सात जखमी यांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
माथेरान घाटात टेम्पो कलंडला; सात पर्यटक जखमी
