रेल रोकोच्या इशार्‍याने पूर नियंत्रित राहण्यासाठी तात्पुरता उपाय

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत-पनवेल रेल्वे लाईन टाकल्यापासून ज्ञानदीप वसाहत परिसरातील शंभरच्यावर कुटुंबांना दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून रहावे लागते. पावसाळ्यात तीन – चार वेळा पाणी येत असल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला. परंतु पावसाळा आला तरी काहीही ठोस उपाय योजना केली नसल्याने कर्जत रेल्वे स्थानकावर 15 जून नंतर कधीही रेलरोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला होता. मात्र मध्य रेल्वेने तीन दिवस त्या परिसरातील पाणी लगेच निघून जावे याची तात्पुरती उपाय योजना केल्याने रेल रोको स्थगित रण्यात आला आहे.

किरवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ज्ञानदीप वसाहतीमध्ये कर्जत-पनवेल रेल्वे लाईनमुळे नेहमीच पुराचे पाणी येते. गेली पंधरा-सोळा वर्ष या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून येथील रहिवासी मध्यरेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर हा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी हाती घेतला आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी पाहणीसाठी आले. त्यावेळी तेथील रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. तरीही ठोस उपाय योजना होत नव्हती. नंतर ओसवाल यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आणि रेल्वे प्रशासनाने सभा आयोजित केली. याप्रसंगी आ. थोरवे, संतोष सांबरी, बिपीन बडेकर, पंकज पाटील, संकेत भासे, अनिल व्हजगे, राहुल वैद्य, केतन बोराडे आदींसह रहिवासी उपस्थित होते. त्यानंतर डॉ. अपर्णा फडके आणि निखिल गवई यांनी दृक्श्राव्य पद्धतीने पूर परिस्थिती व त्यावर काय उपाय करायला हवेत? याचा अभ्यास केला.

त्यानंतर त्या परिसरतील वाहून जाणार्‍या नाल्यांची योग्य ती खोली व सफाई केली. यामुळे तेथील नागरिकांना सध्या तरी थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांनतर रेल रोको स्थगित करण्यात आल्याचे आ. थोरवे यांनी स्पष्ट करताना ’रेल्वे बोर्डाकडे ’कलवर्ट’ बसविण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील असे स्पष्ट केले.

आमच्या परिसरात पावसाळ्यात पाणी येते मात्र रेल्वे प्रशासनाने उपाय योजना केल्याने यंदा पुराचे पाणी येते की नाही. हे पहावे लागेल. मात्र या उपाय योजनेने पुराच्या पाण्यात फरक पडेल असे वाटते.’

– हरिश्‍चंद्र धनवी, ज्ञानदीप वसाहत

पुराच्या पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी ’कलवर्ट’ बसविण्यात यावा. या करिता मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव सुद्धा केला आहे. रेल्वेने तात्पुरती उपाय योजना केल्याने या परिसरातील रहिवाशांना थोडा दिलासा मिळेल. मात्र याचा पाठपुरावा सुरूच राहील.

-पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकता, कर्जत
Exit mobile version