जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची माहिती, मृतांचा आकडा पोचला 20 वर
| रायगड | खास प्रतिनिधी |
इर्शाळवाडी पुन्हा उभी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उद्ध्वस्थ झालेल्या कुटुंबाच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी 60 कंटनेर सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसोयी देण्यात आल्या आहेत. तसेच येथील नागरिकांचे कायमचे पुनर्वसन जुना मुंबई महामार्गावरील चौक येथील सरकारी जागेत एक वर्षातच करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत दिली.
इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जखमींवर एमजीएम आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही 107 नागरिक बेपत्ता आहेत. या ठिकाणी 46 कुटुंबं राहात होती. 17 ते 18 घरांवर दरड कोसळली. सुरुवातीला 25 नागरिकांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आल्याचे म्हसे यांनी सांगितले.
वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन, बॉबकट मशीन नेता येत नाहीत. परंतु, सध्या एनडीआरएफच्या चार तुकड्या, 50 आपदा मित्र, टीडीआरएफचे 22 जवान, इमॅजीका ॲडलॅबचे 82, तर सिडकोचे 460 असे एकूण 900 कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटना जोखीम पत्करुन या शोधकार्यात गुंतले आहेत. खराब हवामान आणि हेलिकॉप्टरच्या कमी वजन पेलण्याच्या क्षमतेमुळे यंत्रसामुग्री वर नेण्यास अडथळा येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाडीवरील नागरिकांना तातडीने औषध उपचार मिळावेत यासाठी छोटेखानी दवाखाना सुरु करण्यात आला आहे. परिसरात साथीचे रोग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी करण्यात येत आहे.
60 कंटेनर तयार असून, दरडग्रस्तांना रविवारी दुपारपर्यंत चौक येथील तब्बल 30 कंटेनरमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या कंटनेरमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. वीज, पाण्याचीदेखील सोय करण्यात आली आहे. किमान एक वर्षभर याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कायमचे पुनर्वसन जुना मुंबई महामार्गावरील चौक येथे सरकारच्या जागेत करण्यात येणार आहे. याबाबत सिडको आणि म्हाडाला तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अद्यापही 107 नागरिक बेपत्ता आहेत. काही नागरिक कामानिमित्त बाहेर गेले आहेत, तर काही नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा योग्य तो शोध घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचेही म्हसे यांनी सांगितले.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात 103 संवदेनशिल गावे आहेत. पैकी 20 धोकादायक आहेत, तर त्यापैकी नऊ गावे ही अतिधोकादायक आहेत. या सर्वांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उर्वरित 83 गावे आहेत ती कमी धोक्याची आहेत. तरीदेखील तेथील पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.