फणसवाडी येथे दहा जनावरे दगावली

जिल्हा पशुसंवर्धन पथक दाखल

| पाली|वार्ताहर

सुधागड तालुक्यातील फणसवाडी येथे गेल्या काही दिवसात अचानक दहा जनावरे दगावली.यामध्ये पाच दुभत्या गाई,पाच बैल आणि पाच अन्य जनावरांचा समावेश आहे. पशु दगावल्यामुळे पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले.ग्रामस्थांनी नांदगाव विभाग पशुधन पर्यवेक्षक प्रशांत वारगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजारी जनावरावर उपचार करून देखील जनावरे दगावल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.

ग्रामस्थांनी जनावरे दगावल्याची खबर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ जिल्हा पशुधन विकास अधिकारी श्याम कदम यांना संपर्क केला. जिल्हा पशुधन विकास अधिकारी श्याम कदम ,तालुका पशुधन अधिकारी सविता राठोड, पशुधन पर्यवेक्षक प्रशांत वारगुडे,चंद्रकांत बर्गे यांचे पथक रविवारी सकाळी 10 वाजता फणसवाडी येथे दाखल झाले. या पथकांनी आजारी जनावरांची पाहणी केली.ग्रामस्थांबरोबर संवाद साधला.आजारी जनावरांमध्ये जी लक्षणे दिसतात त्यावरून मृत जनावरांची हाडे चघळल्यामुळे हळवा हा आजार होऊ शकतो. त्यामुळे जनावरांना अर्धांग वाताचा आजार होऊन ती दगावतात. यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी खबरदारी घेतली तर जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल असे सांगण्यात आले. तसेच ज्या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. त्यांना नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

Exit mobile version