जिल्हा पशुसंवर्धन विभागाची धावपळ
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील फणसवाडी येथे गुरुवारी (दि. 16) सात गुरे अचानक दगावली. पशुपालक संतोष शिंगरे यांनी ही घटना माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांना संपर्क करून सांगितली. त्यानंतर खैरे यांनी तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांना संपर्क करून तातडीने या घटनेकडे लक्ष देण्यास सांगितले. यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी दाखल होत मृत जनावरांचे शवविच्छेदन करुन रोग निदान करण्यासाठी नमुने पुणे येथे पाठविले आहेत.
या घटनेची तात्काळ दखल घेत रायगड जिल्हा प्रशासन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सचिन देशपांडे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली डॉ. अजय कांबळे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुसर्वचिकित्सालय अलिबाग-रायगड, डॉ. अशोक गाढवे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन लघुपशुचिकित्सलय खालापूर, डॉ. सुयोग म्हसकर (पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सुधागड, डॉ. विष्णू काळे, डॉ. सविता राठोड, डॉ. नम्रता काठोले, पशुधन पर्यवेक्षक सचिन ओहोळ, चंद्रकांत बर्गे, स्वराज पानकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृत जनावरांचे शवविच्छेदन व आजारी जनावरांवर उपचार वेळेत आणि तात्काळ केल्याने पशुपालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पशुपालकांना मार्गदर्शन करताना लोकांना सर्व तज्ज्ञांनी जनावरांची काळजी आणि व्यवस्थापनाविषयी माहिती दिली तसेच अज्ञात आजाराच्या माहितीसाठी मृत जनावरांचे नमुने गोळा करून तात्काळ पाठवण्यात आले.
मृत जनावरांची विल्हेवाट व गोठा फवारणी करण्यासाठी उपस्थित ग्रामपंचायत कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्व ग्रामस्थांना खनिज मिश्रण कॅल्शिअम व जंतनाशक औषधाचे वाटप करण्यात आले. मृत जनावरे ग्रामपंचायतीमार्फत खड्डा करून लगेच पुरून टाकण्यात आली आणि पशुसंवर्धन विभागामार्फत संध्याकाळी तात्काळ लसीकरण केल्याने पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाचे आभार व्यक्त केले.
जनावर मेल्यानंतर सर्वप्रथम त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ज्यावेळेस खनिजाची कमी होते, तेव्हा गुरे मेलेल्या जनावरांचे हाड चगळतात. तसेच आता हिरवळ नसल्याने गुरे भुकेच्या अभावी विषारी वनस्पती खातात. त्यामुळेही असे होण्याची शक्यता असू शकते.
– डॉ. सुयोग म्हसकर
मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, रोग निदानाकरिता नमुने रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच दोन आजारी जनावरांना उपचार करण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतीला गावातील प्रत्येक गोठ्यात निर्जंतुकीकरण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
– डॉ.अजय कांबळे,
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, रायगड