। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित लेदर बॉल अजिंक्यपद चषक स्पर्धेत रोशन क्रिकेट क्लबने गुण तालिकेत अव्वल स्थान मिळवत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मर्केट्सच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत क्लिक फ्लीक स्पोर्ट्स एरीना खोपोली, स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली, रोशन क्रिकेट क्लब व पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी अश्या चार संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकदिवसीय 30 षटकांची लीग स्वरूपात खेळवली गेली. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करणार्या भाव्यम झा याला मालिकावीर व उत्कृष्ठ फलंदाज, आर्यमिक धेंबरे याला उत्कृष्ठ गोलंदाज व हर्षित सिंह याला उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षिसवितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गणेश पाटील, आरडीसीएचे मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, सागर कांबळे, किशोर गोसावी, अॅड.पंकज पंडित, संदीप जोशी, निशांत माळी, संकेश ढोले, आदेश नाईक हे उपस्थित होते.