चिंतामणी चषक 2025 कबड्डी स्पर्धा
। मुंबई । प्रतिनिधी ।
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडाळाने 7 व्या ‘चिंतामणी चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन चिंचपोकळी येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत लायन्स स्पोर्ट्स, गुड मॉर्निंग, जय भारत क्रीडा व गोलफादेवी सेवा यांनी पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. तर, हिंदमाता सेवा, शिवमुद्रा प्रतिष्ठान, अमर सेवा व नवोदित संघ यांनी कुमार गटातील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम श्रेणी पुरुषांत लायन्स स्पोर्ट्स विरुद्ध जय भारत, गुड मॉर्निंग विरुद्ध गोलफादेवी, तर कुमार गटात हिंदमाता सेवा विरुध्द शिवमुद्रा प्रतिष्ठान, अमर सेवा विरुद्ध नवोदित संघ अशी उपांत्य लढत होणार आहेत.

स्पर्धेतील पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात लायन्सने विजय क्लबचा दुबळा प्रतिकार 33-18 असा सहज मोडून काढला. मध्यांतराला 18-4 अशी भक्कम आघाडी घेणार्या लायन्सने दोन्ही डावात एक-एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसर्या सामन्यात गुड मॉर्निंगने सिद्धीप्रभा फाऊंडेशनवर 49-17 असा विजय मिळविला. विश्रांती पूर्वी 2 लोण देत 27-8 अशी आघाडी घेणार्या गुड मॉर्निंगने नंतर देखील त्याच जोशाने खेळ करीत आणखी 2 लोण देत 32 गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला. तिसर्या सामन्यात जय भारतने चुरशीच्या लढतीत शिवशक्ती मंडळाचे आव्हान 29-26 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात दोन्ही संघ 11-11 अशा बरोबरीत होते. दुसर्या डावात जय भारतने लोण देत आपला विजय निश्चित केला. शेवटच्या सामन्यात गोलफादेवीने बंड्या मारुतीचा प्रतिकार 27-23 असा मोडून काढला. पूर्वार्धात 11-8 अशी आघाडी घेणार्या गोलफादेवीने उत्तरार्धात संयमाने खेळ करीत आपला विजय साकारला. गोलफादेवीने पूर्वार्धात 2 अव्वल पकड व उत्तरार्धात लोण देत आपला विजय निश्चित केला.
कुमार गटात हिंदमाता मंडळाने वीर संताजीला 42-26 असे नमवित उपांत्य फेरी गाठली. अर्जुन बावधाने, विजय गोरे यांच्या तुफानी खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. प्रणव जाधव, निशांत चव्हाण वीर संताजीकडून बरे खेळले. दुसर्या सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने शिवनेरीचा 47-35 असा पाडाव केला. सुरुवातीला 2 लोण देत विश्रांतीला 27-10 अशी आघाडी घेणार्या शिवमुद्राने नंतर सावध खेळ करीत हा विजय मिळविला. विश्रांतीनंतर शिवमुद्राच्या संथ खेळाचा फायदा उठवीत शिवनेरीच्या सूचित राणे, यश चोरगे यांनी प्रतिहल्ला करीत बाजी पलटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल ठरला. तिसर्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने आकांक्षा मंडळाचा 41-32 असा पराभव करीत आपली आगेकूच सुरूच ठेवली. याच गटात शेवटच्या सामन्यात नवोदित संघाने सूरज जोईल, सिद्धेश पाटील यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसुंदर खेळाच्या बळावर अंकुर स्पोर्ट्सला 43-35 असे नमविले. पूर्वार्धात 19-18 अशी आघाडी घेणार्या अंकुरला शेवटी पराभव पत्करावा लागला.