महिलांकडून बांगलादेशचा पाडाव; पुरुषांकडून श्रीलंकेचा धुव्वा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषकात भारतीय महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पाडाव केला आहे. तसेच, भारताच्या पुरुष संघाने सुद्धा महिलांपाठोपाठ गुणांचे शतक करत मोठा विजय साजरा केला आहे.
दरम्यान, भारतीय महिलांचे आक्रमण इतके जोरदार होते कि त्यापुढे बांगलादेशाचा सहज पाडाव होणार हे लक्षात आल्याने प्रेक्षकांनी सुरवातीपासूनच ढोल ताशांचा नगारा वाजवायला सुरुवात केली होती. भारताची कर्णधार प्रियांका इंगळेने सरसेनापतीची भूमिका बजावत एक-एक खेळाडू बाद करताना जरासुद्धा दयामाया दाखवली नाही. तिला प्रमुख सरदाराच्या भूमिकेतील रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिल्याने बांगलादेशला माघारीची संधीसुद्धा न देता सरळ सरळ मोठा पराभव केला. भारतासाठी हा विजय खूप मोलाचा होता.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने 50 गुणांची कमी केली. तर, संरक्षणात 6 ड्रीम रन मिळवत मध्यंतराला 56-08 अशी मोठी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा 109-16 असा 93 गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताच्या पुरूष संघाने श्रीलंकेवर 100-40 (मध्यंतर 58-18) असा 60 गुणांनी चमकदार विजयाची नोंद केली व उपांत्य फेरीत धडक मारली. रामजी कश्यप, प्रतीक वाईकर आणि आदित्य गणपुले यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या टप्प्यात श्रीलंकेला एकही गुण मिळवू न देत भारताने वर्चस्व गाजवले. दुसर्या टप्प्या श्रीलंकेच्या आक्रमकांनी प्रयत्न केले; मात्र, भारतीय संघाने मिळवलेली मोठी आघाडी श्रीलंकेसाठी फारशी आव्हानात्मक ठरली नाही. तिसर्या टप्प्यात भारताने आक्रमणात गती आणली. शिवा रेड्डी, व्ही. सुब्रमणी, आणि वजीर प्रतीक वाईकर यांनी अप्रतिम स्काय डाईव्ह व पोल डाईव्ह करत श्रीलंकेला दबावाखाली ठेवले. तिसर्या टप्प्यात भारतीय संघाने 100 गुणांचा पल्ला गाठून सामना जवळपास जिंकला होता. शेवटच्या टप्प्यात पाबनी सबर, अनिकेत पोटे, आणि शिवा रेड्डी यांनी संयमाने खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्याचा अंतिम गुफालक 100-40 असा होता. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. भारताच्या दोन्ही संघाची उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे.
इतर उपांत्य फेरी निकाल
महिला गट:
उगांडाने न्यूझीलंडचा 71-26 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेने केनियाचा 51-46 च्या निसटत्या फरकाने पराभव केला.
नेपाळने इराणचा 103-8 ने धुव्वा उडवला.
पुरुष गट:
इराणने केनियाला 86-18 ने पराभूत केले.
दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडचा 58-38 ने विजय मिळवला.
नेपाळने बांगलादेशचा 67-18 ने सहज पराभव केला.