। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बार्न्स महाविद्यालयात मकर संक्रांत व भूगोल दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक विषयांवर आधारित रांगोळी, पोस्टर व भौगोलिक प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि भौगोलिक समस्यांवर आपल्या कलात्मक दृष्टिकोनातून उपाय सुचवले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी, प्रा. शुभांगी जोशी यांनी आपले मनोगत मांडताना सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे प्रा. अंजू सोंखला यांनी अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलात्मक कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी दिली असून, सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम खूप महत्त्वाचा ठरेल, असे मत व्यक्त केले.