| पुणे | प्रतिनिधी |
अजित पवार गटाचे दहा आमदार नाराज असून, ते घरवापसी करणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी दारुण पराभव केला. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या आमदारांनी त्यांच्याशी संपर्क करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का, हे पाहावं लागेल.
अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत. आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळं अजित पवारांचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर आहेत का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. किमान दहा आमदारांनी परतीसाठी पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मात्र, सुप्रिया सुळे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. त्यांच्या या विजयानंतर अजित पवार गटातील राज्यभरातील काही आमदारांनी त्यांना मेसेज करून शुभेच्छा दिल्याने अजित पवार गटाचे दहा आमदार घरवापसी करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
आमदारांमध्ये चलबिचल राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. परंतु, लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर, दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे.