दिल्लीत मित्रपक्षांबरोबर जोरबैठका सुरू
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकवले आहे. भाजप्रणित एनडीएला इंडिया आघाडीने कडवी झुंज दिली आहे. आता सत्तास्थापनेचा दावा करण्याकरिता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चढाओढ दिसतेय. एनडीएने बहुमाताचा आकडा गाठला असून, इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याकरिता जुन्या मित्रपक्षांना बरोबर घेण्याकरिता जोरबैठका सुरू झाल्या आहेत. नवी दिल्लीत एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका पार पडल्या. दरम्यान, एनडीएच्या बैठकीनंतर राष्ट्रपतींना भेटून आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान उपस्थित होते. बैठक संपली असून, एनडीएचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
8 जूनला मोदींचा शपथविधी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून, 17 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस त्यांनी राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानुसार राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, नवी दिल्लीत एनडीएची बैठक झाली असून, त्यात एनडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान, एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार असून, त्यासाठी घटक पक्षांचं समर्थन पत्र दिलं जाणार आहे. येत्या 8 जूनला मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली असून, राष्ट्रपती भवनात या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याचे समजते.






