खांबवली येथे विजेच्या धक्क्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

तळा | श्रीकांत नांदगावकर |

तळा तालुक्यातील खांबवली आदिवासीवाडी येथे दहा वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शेणवली गावच्या हद्दीत तटकरे यांच्या शेतात विजेची तार पोलावरून तुटून खाली पडली होती व त्यामधून विद्युत पुरवठा सुरू होता.दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे ही तार पडली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दुर्दैवाने याच शेतात खांबवली आदिवासी वाडी येथील ऋतिक यशवंत हिलम वय वर्षे १० हा आज सकाळी खेळण्यासाठी गेला असता विद्युत पुरवठा सुरू असलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह.फाटक हे करीत आहेत.ही मन हेलावून टाकणारी घटना समजताच नागरिकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत असून महावितरण विभागाच्या बेजबाबदार पणामुळे संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे.

महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे आज एका निष्पाप मुलाला जीव गमवावा लागला आहे. वीजबिल वसुलीसाठी जेवढ्या तत्परतेने महावितरण काम करते त्या तत्परतेने ईतर कामे करताना दिसत नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे जो पर्यंत महावितरण नुकसानभरपाई देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही.
धनराज गायकवाड – शेकाप चिटणीस

Exit mobile version