| रायगड | प्रतिनिधी |
गेली 44 वर्षे रखडलेल्या करंजा-रेवस खाडीपुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून उरणच्या विस्ताराचा महामार्ग यामुळे मार्गी लागणार आहे. या खाडीपुलामुळे रायगड आणि कोकणातील रस्ते मार्गातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई ते अलिबागमधील रस्ते प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी 1980 पासून चर्चेत असलेल्या 2.4 किमी लांबीच्या करंजा-रेवस खाडीपुलाचा बांधकाम खर्च 300 कोटींवरून 2 हजार 54 कोटींवर पोहचला आहे. या फुगलेल्या खर्चात कामाला सुरुवात होईपर्यंत आणखी काही कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. यामध्ये खाडीपुलासह आठ किलोमीटर लांबीच्या जोडरस्त्याचाही प्रस्ताव असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाने दिला आहे. उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस या दोन बंदरांना जोडणाऱ्या करंजा-रेवस खाडी पुलाच्या उभारण्याच्या हालचाली तिसऱ्यांदा सुरू झाल्या आहेत. राज्य शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या माध्यमातून हा पूल उभारणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उभारणीसाठी सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे 300 कोटी खर्चाचा नियोजित प्रकल्पाचा खर्च वाढून तो 2 हजार 54 कोटींपर्यंत पोहोचला आहे. या पुलामुळे रेवस-करंजा ही दोन्ही बंदरे या खाडी पुलाच्या रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच, नवी मुंबई-अलिबाग दरम्यानचे सुमारे 20 तर मुंबई अलिबागमधील 70 किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.
दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या या पुलामुळे रायगड आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पनवेल, पेण या मार्गांचा वळसा न घालता नवी मुंबईहून उरणच्या करंजा येथून थेट अलिबागला जाता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होईलच. वाहतुक कोडीं अभावी प्रवासही जलद होणार आहे. तसेच, अनेक वर्षांपासून समुद्रातून धोकादायक प्रवासावर अवलंबून असलेल्या उरण, अलिबागसह संपुर्ण रायगडमधील हजारो नागरिकांना या रस्त्याने प्रवास करता येणार आहे.
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी 1980 साली करंजा-रेवस खाडी पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित करंजा-रेवस खाडी पूल तब्बल 44 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर पुन्हा दृष्टिपथात येऊ लागला आहे. या पुलाच्या कामाचे बांधकाम आदेश दिल्यापासून 36 महिने कामाची कालमर्यादा ठेवण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली आहे.