महाड-भोर मार्गावरील सावित्री नदीवरील पुलाची देखभाल व दुरुस्तीसाठी निविदा सूचना

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाड-भोर मार्गावरील सावित्री नदीवरील पुलाची देखभाल व दुरुस्तीसाठी शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना प्रश्न केला. आ जयंत पाटील यांनी म्हटले की रायगड जिल्हयातील महाड-भोर मार्गावर भोराव जवळील सावित्री नदीवर महाड- भोर- पुणे रस्त्याच्या निर्मितीसाठी सन १९५० मध्ये पूल बांधण्यात आला असून सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर या पुलाची तपासणी करण्यात आली होती याबाबत विचारणा केली. सन २०२० व सन २०२१ मध्ये झालेल्या महापुरात वाहून आलेला चिखल, कचरा, लाकडे या पुलाच्या खालील बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला अडकून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून सदर पुलाच्या लोखंडी रेलिंगमध्ये अडकलेली लाकडे, कचरा व वरील बाजूस उगवलेले गवत यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने, या प्रकरणी शासनाने चौकशी करून त्या अनुषंगाने सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन सदर पुलाची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली याबाबत माहिती मागितली.
त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की सन २०२० व सन २०२१ मध्ये झालेल्या महापुरात पुलाच्या ठिकाणी वाहून आलेला चिखल, कचरा, लाकड़े व वरील बाजूस उगवलेले गवत काढण्यात आलेले आहे. सद्य:स्थितीत सदर पुल सुस्थितीत असून पुलावरुन सुरळीतपणे वाहतूक सुरु आहे. चौकशी/कारवाईचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले.
आंबडवे- पाचरळ- मंडणगड- म्हाप्रळ- महाड- वरंध- भोर- लोणंद- पंढरपूर रस्त्याच्या रायगड जिल्ह्यातील एकूण ८१.३२५ कि.मी. लांबीपैकी महाड़ (राजेवाडी फाटा) ते वरंध गाव या १३ कि.मी. लांबीसाठी काँक्रिटीकरणाने दुपदरीकरण करण्याचे काम नवीन पुलाच्या बांधकामासह रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सन २०२१-२२ च्या वार्षिक नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्यानुसार सदर कामाचा प्रस्ताव केंद्र शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत सदर मंजुरीच्या अधिन राहून रस्त्याचे व भोराव येथील सावित्री नदीवरील जुना पुल पाडून नव्याने बांधण्याच्या कामाकरीता निविदा बोलावण्यात आल्या असल्याची माहिती देखील चव्हाण यांनी दिली.

Exit mobile version